*गडचिरोलीत विभागस्तरीय ‘सरस’ प्रदर्शनीचे आयोजन*

47

*गडचिरोलीत विभागस्तरीय ‘सरस’ प्रदर्शनीचे आयोजन*

गडचिरोली दि.२९ : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोली अंतर्गत नागपूर विभागातील ग्रामीण महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विभागस्तरीय ‘सरस’ विक्री व प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार डॉ. मिलींद नरोटे यांच्या हस्ते, आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेत आज करण्यात आले. हा सोहळा कृषी महाविद्यालयाच्या परिसरात पार पडला.

जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार, चेतन हिवंज आणि अन्य मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

महिला बचत गटांसाठी सरस प्रदर्शनी हे हक्काचे व्यासपीठ आहे. महिलांनी गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करून त्यांना आकर्षक सादरीकरणासह विक्री करावी, असे आवाहन यावेळी आमदारद्वयांकडून करण्यात आले. गडचिरोली जिल्हा वन व खनिज संपत्तीने समृद्ध असल्याने त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात १५,००० हून अधिक बचत गट आणि दीड लाख कुटुंबे उमेदच्या माध्यमातून जोडली गेली आहेत, अशी माहिती राजेंद्र भुयार यांनी प्रास्ताविकात दिली. महिला सक्षमीकरणात सरस प्रदर्शनीची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

ही प्रदर्शनी २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या पाच दिवसांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यात महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. महिला उद्योजकतेला बळ देणाऱ्या या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

00