कियर गाव गाठून नक्षलवाद्यांकडून माजी सभापतीची हत्या

13

कियर गाव गाठून नक्षलवाद्यांकडून माजी सभापतीची हत्या

गडचिरोलीमध्ये मागील काही महिन्यापासून शांत असलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नक्षल्यांनी भामरागड तालुक्यात एका माजी सभापतीची फाशी देऊन हत्या केली आहे. सुखराम महागु मडावी (वय 46 वर्ष) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून ते भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती होते.

शनिवार (1 फेब्रुवारी) रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास काही नक्षल्यांनी कियेर गाव गाठून सुखराम मडावीला घरातून गावाबाहेर नेले. गावालगत असलेल्या क्रिकेट ग्राऊंडवर त्यांना बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली.

विशेष म्हणजे यावेळी नक्षल्यांनी त्यांचा तोंड बांधून फाशी लावून मारल्याचे बोलले जात आहे. सुखराम मडावी यांची हत्या केल्यावर नक्षल्यांनी पत्रके देखील टाकले आहे. सुखराम मडावी पोलिसांचे खबरी असल्याचे लिहिले आहे.

मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रकात नक्षलवाद्यांनी खोटे आरोप केले आहेत. सुखराम मडावी हे पोलिसांचे खबरी होते. त्यांनी परिसरात पेनगुंडासारखे नवीन पोलीस मदत केंद्र उघडण्यास पोलिसांना मदत केली होती आणि पोलिसांना माहिती पुरवत होते, असे आरोप नक्षलवाद्यांना पत्रकात केले आहे.

या वर्षातील नक्षलद्यांकडून करण्यात आलेली ही पहिलीच सामान्य नागरिकाची हत्या आहे. गडचिरोली पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे