*रेल्वे स्थानक व भूसंपादनाच्या कामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी*
*वडसा उपविभागाचा आढावा*
गडचिरोली दि.५: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज वडसा उपविभागाचा दौरा करत विविध प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. त्यांनी वडसा पंचायत समितीत आयोजित बैठकीत तालुकास्तरीय यंत्रणेकडून महसूल, कृषी, वन, पूरवठा व रोजगार हमी योजनेच्या कामांची व अडचणींची माहिती जाणून घेतली. मार्चअखेर पूर्ण करावयाच्या योजनांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
उपविभागीय अधिकारी श्रीमती मानसी, रेल्वेचे नागपूर येथील अभियंता श्री विश्वकर्मा, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा भूसंपादन अधिकारी, तहसीलदार प्रिती डुडुलवार,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
*नवीन रेल्वे स्थानक व भूसंपादनाची पाहणी*
जिल्हाधिकारी पंडा यांनी कोंडाळा येथे बांधण्यात येणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाची पाहणी केली. तसेच वडसा-आलोरी रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाची स्थिती जाणून घेतली.
कोंडाळा येथील रेती डेपोला भेट देऊन रेतीची साठवणूक व वितरण नियमानुसार करण्याच्या सूचना दिल्या.
दौऱ्यात जिल्हाधिकारी यांनी वडसा येथील साईवाल गो-पैदास केंद्र, डिजिटल लायब्ररी तसेच जैवविविधता पार्कलाही भेट देऊन त्यातील कामकाज पाहिले. तसेच स्थानिक मायाश्री अॅग्रो इंडस्ट्री राईस मिल येथे भेट दिली.तालुका आरोग्य केंद्राला भेट देऊन त्याचे विस्तारीकरणाबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी त्यांनी वडसा विभागातील विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा व नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश दिले.
यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.