लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडतर्फे एमआयडीसी मैदानावर शानदार सोहळा

21

 

 

गडचिरोली, ता. २० : लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडतर्फे एमआयडीसी मैदानावर आयोजित गडचिरोली जिल्हा प्रीमीअर लिगच्या जेतेपदासाठी बुधवारी (ता. १९ ) दुपारी ४ वाजतापासून महाअंतिम सामना पार पडला. कमांडो संघ विरूद्ध गडचिरोली हरीकेन्स संघात झालेल्या अतिशय रोमांचक सामन्यात हरीकेन्स संघाने गडचिरोली पोलिस दलाच्या कमांडो संघाचा दणदणीत पराभव करत चॅम्पियनशिप पटकाविली. कमांडो संघ उपविजेता ठरला.

 

विजेत्या संघाला गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, माजी मंत्री तथा आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते, माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार दीपक आत्राम, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, लॉयड्स मेटल्स कंपनीचे खंडवावाला, भोलू सोमनानी आदींच्या उपस्थितीत चषक व पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. कमांडो संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कमांडो संघाने २० षटकात ९ गडी बाद ११४ धावा काढल्या. त्यानंतर गडचिरोली हरीकेन्स संघाने फलंदाजीदरम्यान ११४ धावांचा पाठलाग करताना अवघ्या १२.२ षटकात ११६ धावा कुटत केवळ एक गडी गमावत शानदार विजय प्राप्त केला. दरम्यान, विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते चॅम्पियन शिल्ड, ११ लाख रुपयांची रोख रक्कम प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच उपविजेता कमांडोला संघाला ७ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. याशिवाय अहेरी संघांने तृतीय, तर चामोर्शी संघाने चौथा क्रमांक पटकावला. याप्रसंगी सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक आदी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व १ लाख रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. विजेत्या गडचिरोली हरीकेन्स संघाने विजयाचा आनंदोत्सव केला. हरीकेन्स संघाचे कर्णधार विजय कोडापे यांच्या नेतृत्वात या संघाने उत्कृष्ट खेळी करून केवळ १२ षटके दोन चेंडूत कमांडो संघाला पराभूत केले. हरीकेन्सच्या विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी करून विजयानंद साजरा करण्यात आले.

 

 

 

हा अंतिम सामना केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण गडचिरोलीसाठी एक शानदार सोहळा ठरला. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या लाईव्ह परफॉर्मन्सने संध्याकाळ अधिक रंगतदार बनवली आणि प्रेक्षकांना एका सुरेल वातावरणात गुंतवून ठेवले. जिल्ह्यातील १५ ते २० हजार प्रेक्षकांनी गर्दी केली होती. त्यामुळे एमआयडीसी स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते