*_अवकाळी वादळ व गारपीटमुळे मक्का पिकांचे मोठे नुकसान – तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी: मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांची मागणी_*

19

*_अवकाळी वादळ व गारपीटमुळे मक्का पिकांचे मोठे नुकसान – तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी: मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांची मागणी_*

चामोर्शी | २२ मार्च २०२५ – चामोर्शी तालुक्यातील मौजा-विकासपल्ली, रेगडी आणि घोट परिसरात काल (२१ मार्च) सायंकाळच्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी वादळ वाऱ्याने आणि गारपीट पावसाने मक्का पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले असून, तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मा.खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी केली आहे.

*शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या*

या घटनेची माहिती मिळताच मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मक्का हे या भागातील प्रमुख दुबार पीक असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

*शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन*

या घटनेची गांभीर्याने दखल घेत मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या पाहणीत मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी, जेष्ठ नेते बिरेन सर, नानुभाऊ उपाध्याय, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेशजी अधिकारी, तलाठी( पटवारी) कोडापे जी, तसेच परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*तातडीने मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा*
अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या संकटाचा विचार करून शासनाने तातडीने निर्णय घेऊन मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.