जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांना रोजगार मेळाव्यात मिळणार नोकरीची संधी
गडचिरोली, ता. २४ : विपुल खनिज संपदेने समृद्ध असलेल्या आणि आता स्टिल निर्मितीचा जिल्हा म्हणून नावारूपास येणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार (ता. २८) सकाळी १० ते ६ या वेळेत येथील महाराजा सेलिब्रेशन सभागृहात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार असून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ५ हजारांवर बेरोजगार पदवीधर यामध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्यात निर्मिती, आय.टी. ऊर्जा, ऑटोमोबाईल, बँकिंग क्षेत्रातील राज्यभरातील सुमारे ४० नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. पदवी शिक्षण घेत असलेले आणि पदवीधर या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांचे शिक्षण ज्या क्षेत्रातील आहे, त्या क्षेत्राशी संबंधित कंपनी उमेदवारांच्या मुलाखती घेतील. थेट मुलाखतीच्या माध्यमातून त्याच ठिकाणी उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील. तत्पूर्वी त्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. abhijitwanjari.com या वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल. ऑनलाइन नोंदणी सुरू असून आतापर्यत गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे तीन हजारांवर पदवीधर आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.