सुरजागड इस्पातला जनतेची हिरवी झेंडी

34

सुरजागड इस्पातला जनतेची हिरवी झेंडी

गडचिरोली, ता. २५ : आदिवासीबहुल, उद्योगविहीन जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह आधारित कंपन्या स्थापन होत असून मंगळवार (ता.२५) अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची पर्यावरणविषयक जनसुनावणी शांततामय वातावरणात व जनतेच्या सकारात्मक प्रतिसादासह पार पडली. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करताना प्रदूषण न करण्याच्या सूचना देण्यासह सोयीसुविधा व स्थानिकांना रोजगार देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या अध्यक्षतेत ही पर्यावरणविषयक जनसुनावणी पार पडली. या जनसुनावणीत वडलापेठ व परिसरातील नागरिकांनी सुरजागड इस्पात कंपनीला समर्थन दिले. मात्र, नागरिकांनी कंपनीला रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि इतर पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्याची सूचना केली. जनसुनावणीला माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. धर्मराव बाबा आत्राम, माजी आमदार डाॅ. देवराव होळी, माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सोनल कोवे, भाजप नेते रवी ओल्लालवार, बबलू हकीम, हनुमंत मडावी, डॉ. चरणजीतसिंग सलुजा, तनुश्री आत्राम, हर्षवर्धन बाबा आत्राम, खमनचेरू ग्रामपंचायतीचे सरपंच सायलू मडावी, रामलुक उडम, पराग ओल्लालवार, तुळशीराम मडावी, शशिकला काटमवार, दिलीप चौधरी, निरंजन दुर्गे, माजी सरपंच रमेश पेंदाम, माजी सरपंच रमेश मडावी, संतोष आत्राम, ललिता मडावी, सोनाली कोवे, अमृता रॉय आदी उपस्थित होते. या जनसुनावणीत ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलिस पाटील आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला. त्यांचे महत्त्वपूर्ण विचार आणि मते मांडली गेली, ज्यात कंपनीने सामाजिक उपक्रमांवर विशेष लक्ष दिले पाहिजे, असे सांगण्यात आले. जनसुनावणीच्या माध्यमातून, स्थानिक नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि त्या समस्या सोडविण्याबाबत सुरजागड इस्पात कंपनीला जागरूक केले. यामुळे कंपनीला सामाजिक जबाबदारी निभावण्यासाठी दिशा मिळाल्याचे मानले जात आहे. मागील वर्षी या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले होते. स्थानिक नागरिकांना जास्तीत जास्त रोजगार मिळाला यासाठी आमदार डाॅ. धर्मरावबाबा आत्राम यांनी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पुढाकार घेऊन आपली जमिनही दिली आहे. वडलापेठ येथील सुरजागड इस्पातच्या प्रकल्पात बेनिफिशिएशन प्लांट, पॅलेट प्लांट, स्पंज आयर्न प्लांट तसेच इंडक्शन फर्नेस, रोलिंग मिल आणि १५० मेगावॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह पॉवर प्लांट होणार आहे. त्यामुळे वडलापेठ परिसरातील ५ किलोमीटर परिसरातील गावांमधील नागरिक या जनसुनावणीला उपस्थित होते. त्यात खामनचेरू, महागाव (ख.), राजपूर पॅच, बोरी, वांगेपल्ली, टेकडामोटला, येल्ला, शांतीग्राम, चुटगुर्टा आदी गावांतील नागरिकांचा समावेश होता. जनसुनावणीत कंपनीच्या वतीने प्रकल्पस्थळी उभारल्या जाणाऱ्या बाबींसह पर्यावरणाची हानी होणार नाही यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती देण्यात आली. याशिवाय नागरिकांच्या शंकासुद्धा दूर करण्यात आल्या.

९०० झाडांच्या बदल्यात १ लाखांचे वृक्षारोपण…

या जनसुनावणीत आपले मनोगत व्यक्त करताना आमदार डाॅ. धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, हा प्रकल्प उभारताना जवळपास ९०० वृक्ष कापावे लागणार आहे. मात्र या ९०० वृक्षाच्या नुकसानीपोटी कंपनी १ लाख रोपांची लागवड करणार आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. खरेतर या जिल्ह्यातील लोकांच्या हाताला काम नसल्याने प्रचंड बेरोजगारीमुळे हा जिल्हा नक्षलवाद्यांच्या हिंसक छायेत सापडला. पण आता उद्योगांमुळे विकासाचे नवे पर्व प्रारंभ झाले आहे. सरकारने जागा उपलब्ध करून दिल्यास अशाच अनेक प्रकल्पांची उभारणी करून रोजगाराची समस्या कायमची दूर करत या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करता येईल. येथे इतक्या कंपन्या येतील की काम करणारे लोकं कमी पडतील. त्यामुळे सरकारने भविष्यातील प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

—————————