श्री. साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक लूट – AISF ची व्यवस्थापनाला तातडीची कारवाईची मागणी

9

श्री. साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक लूट – AISF ची व्यवस्थापनाला तातडीची कारवाईची मागणी

गडचिरोली: श्री. साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्स, वाकडी येथे विद्यार्थ्यांची अक्षरशः आर्थिक लूट सुरू असून, संस्थेने नियमबाह्य शुल्क आकारून FRA च्या नियमांची पायमल्ली केली आहे. विद्यार्थ्यांकडून ४० हजार ते ९६ हजार रुपयांपर्यंत बेकायदेशीर वसुली करण्यात आल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) ने केला आहे.

AISF चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कॉ. वैभव चोपकर आणि गडचिरोली जिल्हा समन्वयक कॉ. सुरज जक्कुलवर यांनी विद्यार्थ्यांसह महाविद्यालय प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने संपूर्ण अतिरिक्त शुल्क परत करण्याची आणि व्यवस्थापनाच्या मनमानीला लगाम घालण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या रोषामुळे संस्थेचे सचिव डॉ. अमित साळवे यांनी एक आठवड्यात या प्रकरणाचा तपास करून शुल्क परत करण्याचे आश्वासन दिले आहे.

विद्यार्थ्यांच्या तक्रारीतून उघड झालेली धक्कादायक प्रकरणे:

१. नियमबाह्य शुल्क वसुली:

FRA च्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत प्रवेशाच्या वेळी सांगितलेल्या शुल्काच्या पलीकडे ४० ते ९६ हजार रुपयांची जादा लूट केली गेली. परीक्षेसाठी ३,००० रुपये, प्रॅक्टिकलसाठी १,५०० रुपये, स्कॉलरशिप फॉर्मसाठी १०० रुपये, माहिती पुस्तकासाठी ५०० रुपये असे विविध बहाण्यांनी शुल्क वसूल करण्यात आले. या पैशांची कोणतीही अधिकृत पावती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही, ही गंभीर फसवणूक आहे.

२. प्राथमिक सुविधा देखील उपलब्ध नाहीत:

महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना भुलवणाऱ्या आश्वासनांची खैरात केली, पण प्रत्यक्षात मुलभूत सुविधा सुद्धा दिल्या नाहीत. इमारत मध्ये मुलांचे प्रसाधन गृह बांधकाम सुरू नाही, प्रयोगशाळा निकृष्ट, ग्रंथालयाच्या नावाखाली दिखावा, प्राध्यापक अपुरे, रुग्णालय सुविधांचा अभाव – एकूणच शिक्षणाचा स्तर अत्यंत खालावलेला आहे.

३. विद्यार्थ्यांवर मानसिक छळ:

शुल्क न भरल्यास इंटर्नल मार्क्स कपात करण्याची धमकी, वर्गाबाहेर काढणे, वाहतूक सेवा घेण्यासाठी जबरदस्ती, तसेच शिक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्देशून व्यवस्थापनाने धमकावल्याचे उघड झाले आहे.

AISF चा एल्गार – मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन!

AISF ने महाविद्यालय प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे – एका आठवड्यात विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली सर्व अतिरिक्त रक्कम परत करा आणि शिक्षणासंबंधी सुविधा तातडीने उपलब्ध करा, अन्यथा AISF संघर्षाची तयारी करत आहे!

AISF चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कॉ. वैभव चोपकर म्हणाले,

“विद्यार्थ्यांची आर्थिक लूट, फसवणूक आणि मानसिक छळ हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. जर प्रशासनाने एका आठवड्यात विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर AISF च्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची जबाबदारी पूर्णतः व्यवस्थापनावर असेल!”

AISF ने स्पष्ट इशारा दिला आहे की, शिक्षण हे हक्काचे असून, विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागणार नाही. शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात संघटना कटिबद्ध आहे.

बैठकीला उपस्थित:

यावेळी AISF च्या वतीने राज्याध्यक्ष कॉ. वैभव चोपकर, जिल्हा समन्वयक कॉ. सुरज जक्कुलवर, कॉ. डॉ. महेश कोपुलवार, कॉ. देवराव चवळे, कॉ. सचिन मोतकुरवार आणि असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. व्यवस्थापनाच्या वतीने प्राचार्य उत्तम खंते आणि सचिव डॉ. अमित साळवे यांनी चर्चेत सहभाग घेतला.