*जैन समाजभवन व साधुसंतांसाठी निवाऱ्याची आवश्यकता* – *ललीत गांधी* 

22

*जैन समाजभवन व साधुसंतांसाठी निवाऱ्याची आवश्यकता*

– *ललीत गांधी*

 

*अल्पसंख्याक कल्याण योजनांचा आढावा*

 

*जैन व्यापाऱ्यांनी उद्योग-व्यवसायात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन*

 

गडचिरोली, २८ मार्च – गडचिरोली जिल्ह्यातील जैन समाजासाठी स्वतंत्र समाजभवन उभारणे ही काळाची गरज असून या समाजाचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी हे भवन अत्यंत उपयुक्त ठरेल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने समाजभवनासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या सूचना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललीत गांधी यांनी आज गडचिरोली येथे घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जैन समाजाच्या विविध गरजांचा आणि केंद्र व राज्य सरकारच्या अल्पसंख्याक कल्याण योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी श्रीराम पाचखेडे आदी उपस्थित होते.

 

श्री. गांधी यांनी जैन समाजासाठी समाजभवन सोबतच पायी प्रवास करणाऱ्या जैन साधू-संतांसाठी महामार्गालगत निवाऱ्याच्या सुविधा निर्माण करण्याचे, तसेच जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण समितीत जैन समाज व इतर सर्वच अल्पसंख्यांक समाजातील प्रतिनिधीचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या.

 

*शासकीय योजनांचा लाभ जैन समाजापर्यंत पोहोचवा*

 

जैन समाज हा पारंपरिक दृष्टिकोनातून स्वावलंबी असला, तरी काही भागांत त्यातील अनेक कुटुंबे आजही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. “शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात जैन समाज अद्याप मागे आहे. त्यामुळे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्या समाजाच्या गरजू घटकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे,” असे श्री. गांधी यांनी स्पष्ट केले.

 

या अनुषंगाने त्यांनी प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम, अल्पसंख्यांक बहुल नागरी व ग्रामीण क्षेत्र विकास योजना, मदरसा आधुनिकीकरण योजना, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण इत्यादी योजनांचा आढावा घेतला. जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी या योजनांची माहिती सादर केली.

 

*स्थानिक जैन व्यापाऱ्यांशी अर्थविकासावर चर्चा*

 

बैठकीनंतर श्री. ललीत गांधी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जैन समाजातील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. “गडचिरोली जिल्हा वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. विविध औद्योगिक व व्यापारिक क्षेत्रांमध्ये येथे मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. जैन समाजाने येथील उद्योग व्यापारात सक्रीयसहभाग नोंदविण्यासाठी व जिल्ह्याची अर्थव्यवस्‍था विकसित करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री. गांधी यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या उद्योगविषयक योजनांबाबत मार्गदर्शन केले.

बैठकीनंतर श्री.गांधी यांनी पत्रकारांशीदेखील संवाद साधला.

बैठकीला जिल्हा भूसंपादन अधिकारी प्रसेनजीत प्रधान, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड, नगरपालीकेचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे (माध्यमिक), बाबासाहेब पवार (प्राथमिक), जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे इतर संबंधीत अधिकारी तसेच जैन समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.