**विद्यार्थ्यांकडून अनधिकृत शुल्कवसुलीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांची तक्रार**
गडचिरोली: गडचिरोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी(ADHO) डॉ. अमित साळवे यांच्या श्री. साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्स, वाकडी येथील विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त शुल्क आकारल्याच्या प्रकरणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, महाविद्यालय प्रशासनाने FRA च्या नियमांचे उल्लंघन करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून ४०,०००/- ते ९६,०००/- रुपये अतिरिक्त शुल्क घेतले आहे. तसेच, परीक्षेच्या नावाखाली ३,०००/-, प्रॅक्टिकलसाठी १,५००/-, शिष्यवृत्ती फॉर्मसाठी १००/- आणि माहितीपत्रकसाठी ५००/- रुपये वसूल केले गेले आहेत. याशिवाय, कोणत्याही शुल्काची अधिकृत पावती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही.
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना आश्वासित सुविधांचा अभाव असून, प्राध्यापक वर्ग अपुरा आहे. नियमित वर्ग घेतले जात नसून, विद्यार्थ्यांना मानसिक छळास सामोरे जावे लागत आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना स्वतः डॉ. अमित साळवे यांच्याकडून धमकावण्यात आले व अंतर्गत गुण कमी करण्याची धमकी देण्यात आली.
AISF ने महाविद्यालय प्रशासनास अतिरिक्त शुल्क परत करण्याबाबत व आवश्यक शैक्षणिक सुविधा पुरविण्याबाबत २४ मार्च २०२५ रोजी लेखी निवेदन दिले होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, संस्थेचे सचिव डॉ. अमित साळवे जे गडचिरोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, यांनी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची योग्य चौकशी करावी व वसूल केलेले अनधिकृत शुल्क परत करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी AISF च्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी मा. सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारले व संबंधितांना तात्काळ पत्र पाठवून एका आठवड्यात समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळामध्ये कॉ. वैभव चोपकर, राज्याध्यक्ष, कॉ. प्रतीक्षा ढोके, राज्यसचिव, AISF, कॉ. सुरज जक्कुलवर, जिल्हा समन्वयक, AISF गडचिरोली यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.