*रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करा अन्यथा जन आंदोलन उभारू ; काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा ईशारा*
गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून रानटी हत्तीने धुमाकूळ घातली असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यामुळे हवालदिल झाले आहेत.
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वारंवार पत्रव्यवहार करून निदर्शने करून मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून रानटी हत्ती व इतर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत आहे. मागील काळात वनमंत्री यांच्या घरावर घंटानाद आंदोलन करण्यात आले तसेच गडचिरोली ते नागपूर पर्यंत पायी मोर्चा सुद्धा काढून जिल्ह्यातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी राज्याचे ततकालीन उप मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे केली असता त्यांनी यावर उपाय योजना करण्याचा शब्द दिला होता.
काँग्रेसने केलेल्या मागणीमुळे दोन वर्षानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर्षी जंगली वाघांचा बंदोबस्त करण्याच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्यासंदर्भात निर्देश जारी केले, मात्र फडणवीस साहेब पालकमंत्री असलेल्याच गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीने सुद्धा जिल्ह्यातील नागरिकांचे जगणे कठीण केले असताना सुद्धा अजून पर्यंत या हत्तींचा बंदोबस्त करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कुठल्याही प्रकारच्या निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला दिलेले नाही. ऐन पीक निघण्याच्या वेळेवर जंगली हत्तीकडून मोठ्या प्रमाणात पिकाचे नासधूस केल्या जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, हत्तीने किंवा अन्य वन्यप्राण्या द्वारे केलेल्या नुकसानीची देण्यात येणारी मदत ही अत्यन्त तटपुंजी आहे, त्यामुळे ते धान शेतीला एकरी किमान सरसकट 1 लक्ष रुपये तर मका पिकाला एकरी सरसकट 2 लक्ष रुपये देण्यात यावी व या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करण्यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालून रानटी हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हजारो शेतकऱ्यांना घेऊन जिल्ह्यात मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.