**शासकीय सेवेत निवड झालेल्या युवकांचा शिवराय सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार समारंभ**
नवेगाव मुरखडा (ता. गडचिरोली) – दिनांक 10 एप्रिल रोजी शिवराय सामाजिक संस्था नवेगाव मुरखडा यांच्या वतीने शासकीय सेवेत निवड झालेल्या युवकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य सत्कारमूर्ती म्हणून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले **गणेश किशोर गडपल्लीवार**, आरोग्य सेवकपदी निवड झालेले **राहुल गंगाधर गेडाम**, तसेच स्थापत्य अभियंतापदी निवड झालेले **पराग हिराचंद नेवारे** यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सत्कारमूर्तींसोबत त्यांच्या पालकांचीही उपस्थिती लाभली होती. यावेळी राहुल गेडाम आणि पराग नेवारे यांनी आपल्या प्रवासातील संघर्षाची आठवण करून देत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांनी सातत्याने घेतलेल्या मेहनतीला योग्य गौरव मिळावा, तसेच भविष्यात शासकीय सेवेत जाण्याचा ध्यास घेतलेल्या विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळावी हा होता. यापुढेही निवड झालेल्या मित्रांकडून उत्कृष्ट सेवा कार्य व्हावे आणि समाजहितासाठी त्यांचे योगदान सतत वाढावे, यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवराय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष **परमानंद राजू पुन्नमवार** यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः अध्यक्ष परमानंद पुन्नमवार यांनी केले, तर प्रस्तावना **मयूर मुनघाटे** यांनी केली. यावेळी संस्था पदाधिकारी, गावकरी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.