फुले आंबेडकरांची संयुक्त जयंती होणे हि क्रांतिकारी घटना — रोहिदास राऊत
गडचिरोली १३ एप्रिल (जिल्हा प्रतिनिधी) प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेच्या विचारांमुळे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानले. आज या दोन्ही महान समाजसुधारकांची जयंती एकत्रितपणे साजरी करणे ही खरोखरच एक क्रांतिकारी गोष्ट आहे आणि त्यामुळे सामाजिक समतेच्या विचाराचा प्रसार होण्यास मदत होईल, असे मत रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांनी व्यक्त केले.
कुरखेडा तालुक्यातील सोनेरंगी गावात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. जीवन पाटील नाट, मुनघाटे महाविद्यालयाचे डॉ. दशरथ आडे, संविधान फाउंडेशनचे गौतम मेश्राम, बौद्ध महासभेचे तुलाराम राऊत, पंचायत समितीचे माजी प्रभाकर तुलावी, तालुका काँग्रेस समितीचे जयंत हरडे, आदिवासी कार्यकर्ते प्रा. अनिल होळी, नाविन्यपूर्ण शाळेतील नंदुजी मसराम, गुरुदेव निकोडे, शालिक जनबंधू हे प्रमुख उपस्थित होते.
श्री. राऊत पुढे म्हणाले की, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब दोघांनीही प्रचंड सामाजिक प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष केला आणि दलित आणि शोषित वर्गाच्या हक्कांसाठी अथकपणे काम करत राहिले. त्यांचे कार्य येणाऱ्या काळात प्रेरणादायी राहील.
डॉ. दशरथ आडे यांनी नमूद केले की, महात्मा फुले यांनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म या आधुनिक इतिहासातील दोन महत्त्वाच्या घटना आहेत. या दोन्ही चळवळी समाजात प्रचलित असलेल्या रूढीवादी जाती व्यवस्थेविरुद्ध बंड म्हणून सुरू झाल्या होत्या. समता आणि बंधुत्वाच्या आदर्शांमुळे दोन्ही चळवळी पुढील पिढ्यांसाठी पुढे जातील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
श्री. गौतम मेश्राम यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की या राष्ट्रीय दस्तऐवजामुळे लोकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. नागरिकांना त्यांचे हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव करून देण्यासाठी संविधान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी इतर पाहुण्यांनीही आपले विचार व्यक्त केले. रात्री प्रसिद्ध गायक विकी भैसारे यांचा ‘उजालाली धम्मज्योत भीम स्वरांची’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
शरद जांभुळकर यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमाचे संचालन छोटू कोटांगले यांनी केले आणि आभार कृष्णा चौधरी यांनी मानले.