नागरिकांना दिलेला शब्द प्राधान्याने पूर्ण करू शकलो याचा मनापासून आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार
मारोडा – उमरी रस्त्याचे व पुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन संपन्न
चंद्रपूर:- जिल्हयातील प्रसिध्द तिर्थस्थळ व पर्यटनस्थळ असलेल्या सोमनाथ देवस्थानाचा परिसर अर्थात मारोडा परिसरात मारोडा-उमरी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करण्याची नागरिकांची मागणी मी खनिज विकास निधीच्या माध्यमातुन प्राधान्याने पूर्ण करू शकलो याचा मला मनापासून आनंद असल्याची भावना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. सदर पुलाचे व रस्त्याचे बांधकाम पावळयापूर्वी पूर्ण करण्याच्या सुचना सुध्दा आ. मुनगंटीवार यांनी दिल्या.
दिनांक १८ मार्च रोजी मुल तालुक्यातील मारोडा येथे खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर मारोडा उमरी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम तसेच मारोडा – उमरी रस्त्याच्या बांधकामाच्या भूमीपूजन समारंभात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी या नात्याने पंचायत समितीचे सभापती चंदू मानगोनवार, सरपंच भिकारू शेंडे, उपसरपंच अनुप नेरलवार व सर्व ग्राम पंचायत सदस्यांची उपस्थिती होती. श्री. प्रेमदासजी गेडाम, श्री. नामदेवराव गुरनुले, श्री. चंद्रकांत मुद्दमवार, श्री. नथ्थुजी खडसंग, श्री. सोमाजी भोयर यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न झाले.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी मी मारोडा येथे कार्यक्रमासाठी आलो असता नागरिकांनी सदर रस्त्याची व पुलाच्या बांधकामाची मागणी माझ्याकडे केली होती. मी नागरिकांना या रस्त्याच्या व पुलाच्या बांधकामासाठी शब्द दिला होता. सदर शब्द मी पूर्ण करू शकलो व खनिज विकास निधीतुन या बांधकामासाठी ५० लक्ष रू. निधी मंजूर करू शकलो याचा मनापासून आनंद असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. हा परिसर कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या सारख्या कर्मवीराची भूमी आहे, कर्मयोगी बाबा आमटे यांच्या सेवा प्रकल्पाची भूमी आहे. या परिसराच्या विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. मारोडा ग्राम पंचायत क्षेत्रातील नक्षत्र उद्यानासाठी मंजूर चेनलिंक फेसींगचे भूमीपूजन सुध्दा यावेळी करण्यात आले.
यावेळी सोमनाथ देवस्थान परिसराची पाहणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सींग पाळून कार्यक्रम संपन्न झाला.