अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्या नागरिकांना तात्काळ घरकुल मंजूर करा

96

अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्या नागरिकांना तात्काळ घरकुल मंजूर करा

आदिवासी बहुल लोकसभा क्षेत्रातील घरकुलाचा कोटा वाढवुन द्या

खासदार अशोक नेते यांची नियम 377 सूचनेनुसार संसदेत मागणी

नई दिल्ली :- दि. 22 मार्च

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र हा महाराष्ट्रातील अतिमागास, अविकसित व उद्योग विरहित क्षेत्र म्हणून परिचित आहे. या क्षेत्रात अनुसूचित जाती, जनजाती, इतर मागास प्रवर्ग तथा गरीब नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नागरिकांकडे राहण्यासाठी स्वतः चे घर नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घरे नसलेल्या कुटुंबियांसाठी घरकुलांची संख्या वाढविण्याची मागणी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी नियम 377 अधीन सूचनेनुसार आज दि 22 मार्च रोजी संसदेच्या सभागृहात केली व गरीब नागरिकांच्या घरकुलांच्या विषयांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले.

मागील वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अकाली झालेल्या अतिवृष्टी मुळे क्षेत्रातील अनेक गावांमधील घरे क्षतीग्रस्त झाली, अनेक घरे कोसळली, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे तिथे वास्तव्य करीत असलेले शेकडो नागरिक बेघर झाले. त्यांना इतरत्र आसरा घेऊन निवारा करावा लागत आहे. अनेकांची आर्थिक स्थिती कमकुवत, हलाखीची असतानाही त्यांना भाड्याने घर घेऊन रहावे लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन केंद्र शासनाने अतिवृष्टी ने ग्रस्त, बेघर झालेल्या नागरिकांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे तथा काही प्रमाणात क्षतिग्रस्त झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद यथशिग्र करण्याची मागणीही यावेळी खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत केली व घरकुलांच्या या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र शासनाचे लक्ष केंद्रित केले.
नियम 377 अधीन सूचनेनुसार हा मुद्दा खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत उचलून याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.