प्रवेशद्वार,सौंदर्यीकरणाची कामे रद्द करून महानगरपालिकेने कोविड वर खर्च करावा…
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून रूग्णांचे जीव वाचवावे…
नगरसेवक पप्पू देशमुख यांची मनपाच्या विशेष सभेत मागणी
चंद्रपूर:
ऑक्सीजन सिलेंडर, अक्सिजन व त्यासाठी लागणारी इतर सामग्री याचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे कोविड रुग्णालय उभारण्यावर मर्यादा येत आहेत. यावर उपाय म्हणून हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या ऑक्सिजन काॅन्सट्रेटरची मोठ्या प्रमाणात खरेदी करून रुग्णांचे प्राण वाचवावे.तसेच प्रवेशद्वार व सौंदर्यीकरणाचे कमी गरजेची कामे तात्पुरती रद्द करून सर्व निधी कोरोना रुग्णांना उपचाराच्या सुविधा देण्यासाठी वापरण्यात यावा अशी मागणी जनविकास सेनेचे वडगाव प्रभागातील नगरसेवक पप्पू देशमुख यांनी विशेष सभेमध्ये केली. नगरसेवक देशमुख यांच्या स्वतः च्या प्रभागात गजानन महाराज व साईबाबा मंदिरच्या रोडवर लाखो रुपये खर्च करून प्रवेशद्वार उभारण्यात येत आहे.गजानन महाराज आणि साईबाबा यांनी दाखविलेला सेवेचा मार्ग पत्करून वडगाव प्रभाग किंवा शहरातील इतर ठिकाणचे सौंदर्यीकरण व प्रवेशद्वाराची कामे रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.शहरातील कोरोना रूग्णांसाठी ४५ बेडचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारण्याच्या हेतुने आज मनपाची विशेष सभा आयोजीत करण्यात आली होती. या विशेष सभेमध्ये देशमुख यांनी ही मागणी केली. सिद्धार्थ हॉटेल मागील मनपाच्या रैन बसेरा येथे ४५ बेडचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारणीच्या विषयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली व सूचना सुध्दा दिल्या.
भाजपचे गटनेते वसंत देशमुख यांनी हॉस्पिटल उभारणीच्या कामाबाबत सविस्तर माहिती सभागृहाला देण्याची सूचना केली.बसपाचे गटनेते अनिल रामटेके यांनी बाबुपेठ येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात कोविड हॉस्पिटल उभारण्याची मागणी केली. तसेच सभागृह नेते संदीप आवारी,शिवसेनेचे गटनेते सुरेश पचारे यांच्यासह पप्पू देशमुख व इतर नगरसेवकांनी आपले पुढील काळातील संपुर्ण मानधन कोविड रुग्णांवर उपचारासाठी देण्याची तयारी विशेष सभेमध्ये दर्शवली.
काय आहे अक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ?
ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर हे इलेक्ट्रिकवर चालणारे एक पोर्टेबल उपकरण आहे. ५ लिटर,७ लिटर व १० लिटर प्रति मिनिट अशा वेगवेगळ्या क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा करणारे ऑक्सिजन कान्सन्ट्रेटर बाजारात उपलब्ध असतात.ऑक्सीजन पातळी ९० ते ९४ च्या दरम्यान असणाऱ्या रुग्णांना या उपकरणाने ऑक्सिजन पुरवठा करून उपचार सुरु ठेवणे शक्य आहे. ऑक्सिजन पुरवठ्या अभावी रुग्णांची ऑक्सीजन पातळी वेगाने खालावण्याचे प्रमाण वाढल्याने असे उपकरण उपलब्ध केल्यास शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य होईल. वर्धा येथील सावंगी मेघे व इतर अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये हा पर्याय वापरण्यात येत आहे.विशेष म्हणजे ऑक्सीजन सिलेंडर किंवा लिक्विड ऑक्सिजन वर विसंबून राहण्याची यासाठी गरज नाही. सध्या या उपकरणाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्यामुळे ५० ते ५५ हजार रुपयांपर्यंत याची किंमत गेलेली आहे. एक कोटी रुपये खर्च करून २०० अक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करणे शक्य आहे. यामुळे ऑक्सिजनची गरज असणाऱ्या दोनशे रुग्णांना एकाच वेळी दिलासा मिळू शकतो. इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाल्यास जनरेटरवर हे उपकरण चालवणे शक्य आहे.