कोरोनाच्या मृतांवर २२ जिगरबाज योध्याकडून विधिवत अंत्यसंस्कार

156

कोरोनाच्या मृतांवर २२ जिगरबाज योध्याकडून विधिवत अंत्यसंस्कार

९ महिन्यापासून न थकता सातशेहून अधिक मृतदेहाला खांदा

चंद्रपूर, ता. २४ : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा अंतिमसंस्कार हा संवेदनांना गोठवून टाकणारा क्षण. निर्बंधामुळे नातलगसुध्दा मृतदेहाला खांदा देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत परिवार, कुटूंब, धर्म, समाज बाजूला ठेवून चंद्रपूर महानगरपालिकेचे २२ जिगरबाज योद्धे मागील ९ महिन्यापासून न थकता अंतिम संस्कारासाठी जीवाची बाजी लावत आहेत.

चंद्रपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जाते. या स्मशानभूमीत गेल्या वर्षभरात आतापर्यंत सातशेहून अधिक कोरोनाबाधीतांच्या मृतदेहावर त्यांच्या धर्मातील प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला कोविड-१९ चा मृत्यू ऑगस्ट २०२० मध्ये रहमतनगर येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीचा ठरला. त्याचे अंत्यसंस्कार पठाणपुरा बाहेरील स्मशानभूमीत करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खांदा देत अंत्यसंस्कार केले. हा सर्व प्रकार मनपा कर्मचाऱ्यांसाठी नवीन होता. तेव्हापासून आतापर्यंत हे सेवाकार्य २२ जिगरबाज योद्धे देत आहेत. कोव्हिड रुग्णांजवळ राहणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. मात्र, कोरोना संकटकाळात राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे काम हे कर्मचारी करीत आहेत.

खासगी हॉस्पिटल आणि गृहविलीगीकरणातील मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले जातात. नातेवाईकांना मृतकाचे अंत्यदर्शन घडवले जाते. मृतदेहांची निश्चित संख्या झाल्यावर शववाहिका आणली जाते. प्रशासकीय प्रक्रिया आणि नोंद करून स्मशानभूमीत आणतात. एका वाहनात मृतदेह आणि दुसऱ्या वाहनात कर्मचारी मोक्षधाम स्मशानभूमीत पोहचतात. इकडे काही कर्मचारी पूर्वीच दहन विधीसाठी लाकूड रचून ठेवतात. महानगरपालिकेमार्फत लाकूड, डिझेल, पीपीए किट, बॉडी कव्हर आणि अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य मोफत पुरविण्यात येते. प्रत्येक मृतकाचे अंत्यसंस्कार त्यांच्या धार्मिक विधीनुसार केले जाते. त्यानंतर अस्थी गोळा करून विसर्जनसाठी नातलंगाना दिले जाते. जर नातलग उपस्थित नसतील तर अस्थी पिशवीत बांधून त्यावर चिट्ठी लावून ठेवली जाते. प्रत्येक अंत्यसंस्कार नंतर जागा स्वच्छ केली जाते. मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांसाठी वेगळे वाहन पाठविण्यात येते. त्यांच्या विधीनुसार त्यांचा अंत्यविधी होतो. ही प्रक्रिया दररोज केली जाते. पहाटे ६ वाजता घराबाहेर निघतात आणि रात्री उशिरापर्यंत सेवेत असतात. गेल्या ९ महिन्यापासून हे नियमीत सुरू असल्याचे स्वच्छता निरीक्षक महेंद्र हजारे, प्रवीण हजारे यांनी सांगितले.