धान खरेदी केंद्रावरील उघड्यावर असलेल्या धानाची उचल करून तातडीने भरडाई करा
आमदार डॉक्टर देवरावजी होळी
उघड्यावरील धान्याची नासाडी होऊन शासनाचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान
दिनांक 27 एप्रिल 2021 गडचिरोली:-
आदिवासी विकास महामंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती फेडरेशनच्या मार्फतीने गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धान् खरेदी केली जाते परंतु धानाची खरेदी केल्यानंतर त्या धानाची योग्य वेळी उचल व भरडाई केली जात नसल्याने ते धान्य उघड्यावरच पडून राहते परिणामी धानाची नासाडी होऊन शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे उघड्यावरील धान्याची तातडीने उचल करून भरडाई करावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे.
दरवर्षी धान खरेदी केंद्रावरील धान उघड्यावर राहत असल्याने अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे धान्य खराब होते, सडते . परंतू एकदाही अशा खराब झालेल्या धानाची साधी चौकशी केली जात नाही व त्याचे नियोजनही केल्या जात नाही ही एक मोठी शोकांतिका असल्याचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी म्हटले आहे. यामागे मोठे रॅकेट असून जाणीवपूर्वक हे धान उघड्यावर ठेवून खराब केले जाते. मात्र यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्या जात आहे. यामध्ये शासकीय अधिकारी सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासंदर्भात कोणत्यातरी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी . व जबाबदार अधिकाऱ्यास दोषी धरण्यात यावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनजी भुजबळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.