आदिवासी, दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे खास.अशोक नेते यांचे निर्देश
देवरी :- देवरी तालुक्यातील कोविडची भयावह स्थिती लक्षात घेता यावर नियंत्रण मिळवून कोविड चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. तसेच लसीकरण करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देऊन व नागरिकांमध्ये जनजागृती करून अधिकाधिक लसीकरण करण्याच्या सूचना केल्या. तसेच कोविड रुग्णावर योग्य उपचार करून कोविड रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी दिले. देवरी तहसील कार्यालयात आज 11 मे रोजी आयोजित कोविड च्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देतांना ते बोलत होते.
देवरी तालुक्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते झामसिंगजी येरणे, ज्येष्ठ नेते संतोषजी तिवारी, तालुका अध्यक्ष अनिलजी येरणे, ज्येष्ठ नेते बंटीजी भाटिया, तालुका महामंत्री प्रवीण दहीकर, तालुका महामंत्री विनोद भांडारकर, अल्पसंख्याक मोर्चा चे इमरानजी खान, देवरीचे उपविभागीय अधिकारी चंद्रमनी मोडक, तहसीलदार विजय बोरुडे, प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक , पोलीस निरीक्षक, बीडीओ, नप मुख्याधिकारी व अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी कोविडच्या स्थितीचा व लसीकरणाचा आढावा घेतला असता आतापर्यंत एकूण 2182 कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून यावर्षी 1500 रुग्ण कोरोना बाधीत आढळले यापैकी सद्यस्थितीत 510 कोरोना बाधीत रुग्ण असून तालुक्यात 26 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधीक्षक यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत 45 वर्षवरील 8 हजार नागरिक व 4 हजार कर्मचारी असे एकूण 12 हजार नागरिकांचे लसीकरण झाल्याचेही त्यांनी सांगितले
आढावा दरम्यान खासदार अशोक नेते यांनी कोरोना मुक्त रुग्णांना 14 दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात यावे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव पाठवून वरिष्ठांकडे निधीची मागणी करून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. तथा कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालय अद्ययावत ठेवून रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले तसेच देवरी स्मार्ट सिटीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रकल्प अधिकारी यांना दिले.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी आदिवासी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असून अधिकाऱ्यांनी जनजागृती शिबिर घेऊन लोकांना कोविड आजार व लसीकरण संबंधातील माहिती द्यावी व कोरोना रुग्णांवर योग्य उपचार करुन कोरोना पळविण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिल्या. बैठकीला प्रमुख अधिकारी उपस्थित होते.