*नागपूर मेट्रोचा प्रवास, सुरक्षित प्रवास…!

104

 

गोंदिया : नागपूर मेट्रो ही विदर्भाची शान आहे. रस्त्यावरील अपघात कमी होण्यासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी, सुरक्षित प्रवास करण्यासाठी मेट्रोचा प्रवास करा, असे आवाहन करीत नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गोंदिया आणि सडक अर्जुनी येथे आयोजित ‘विदर्भ मेट्रो संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर मेट्रोच्या विविध योजनांची, उपक्रमांची माहिती दिली.सडक अर्जुनी येथे गुरुकुल करिअर अकादमीमध्ये संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. राजकुमार भगत, कोषाध्यक्ष वामन लांजेवार, डी.के. मेश्राम, गुरुकुल करिअर अकादमीचे ओमेश्वर कापगते प्रामुख्याने उपस्थित होते. गोंदिया येथे सुभाष गार्डनमधील हुतात्मा वाचनालयात संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. डॉ. माधुरी नासरे, प्रा. सविता बेदरकर यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील महिला, पुरुष व अधिकारी सहभागी झाले होते. या दोन्ही कार्यक्रमात मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी नागपुरातील मेट्रोविषयी माहिती दिली.आपण गोंदियात राहात असला तरी आपल्या आयुष्यातील अनेक आनंदी क्षण मेट्रोच्या साहाय्याने ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’या उपक्रमाच्या माध्यमातून द्विगुणित करु शकता, असे सांगत या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. व्यापाराच्या दृष्टीने मेट्रोच्या काय योजना आहेत, मेट्रोच्या प्रवासात गोंदियाचा व्यक्ती मेट्रो आणि फीडर सर्व्हिसच्या माध्यमातून कसा प्रवास करु शकतो, मेट्रोमधून सायकल कशी नेऊ शकतो, महिलांच्या दृष्टीने मेट्रो कशी सुरक्षित आहे, मेट्रोचे महाकार्ड प्रवाशांसाठी कसे सोयीचे आहे, त्याचे फायदे काय, याबाबत सविस्तर विवेचन केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या शंकांना आणि प्रश्नांना मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. यावेळी सर्वांनी मेट्रोच्या सेल्फी फ्रेमसोबत सेल्फी काढून घेतले. नागपुरात आल्यानंतर मेट्रोचा प्रवास करण्याच्या दृष्टीने आम्हाला उत्तम माहिती मिळाली, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.