जिल्हयात दि.16 जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला शुभारंभ शुभारंभ दिनी 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार लस

145

जिल्हयात दि.16 जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला शुभारंभ

शुभारंभ दिनी 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार लस

गडचिरोली,(जिमाका)दि.13:
जिल्हयात पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार असून त्याचा शुभारंभ दिनांक 16 (शनिवार) रोजी होत आहे. त्या दिवसी जिल्हयातील पाच लसीकरण केंद्रावर प्रत्येकी 100 कर्मचारी या प्रमाणे एकुण 500 लोकांना लस टोचणार आहेत. या लसीकरणाच्या शुभारंभ दिना निमित्त व त्याच्या नियोजनाबाबत व्हीसीद्वारे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी नागपुर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, डॉ. बागराज दुर्वे, उप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर उपस्थित होते.

गडचिरोली जिल्हयातील जिल्हा सामान्य रुग्णालय, अहेरी, आरमोरी, कुरखेडा व चामोर्शी उपजिल्हा रुग्णालय अशा पाच ठिकाणी 100 प्रमाणे 500 कर्मचाऱ्यांना लस दिली जाणर आहे. यानंतर 9966 पैकी उर्वरीत आरोग्य कर्मचाऱ्यांना पुढिल काळात लस दिली जाणार आहे. या नियोजनाबाबत आढावा घेताना विभागीय आयुक्त यांनी उपस्थितांना सूचना केल्या. ते यावेळी म्हणाले, जिल्हयात मुख्यालयी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. लसीकरणाबाबत पूरवठा, साठवणूक व प्रत्यक्ष लसीकरण याबाबत त्या कक्षातून सनियंत्रण करावे. लसीकरणपश्चात येणाऱ्या अडचणी व चूकीचे गैरसमज दूर करण्यासाठी हा कक्ष काम करेल, त्याच बरोबर लसीकरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी,व्यत्यय व लोकांकडून येणाऱ्या समस्या अतितात्काळ सोडविण्यासाठी सर्व सहा जिल्हयातील या प्रक्रियेतील अधिकारी, डॉक्टर्स व तज्ञ यांचा व्हॉटसॲप ग्रुप केला जाणार आहे. जेणेकरुन लसीकरण प्रक्रिया सोयीस्कर होईल असे ते म्हणाले.

लसीकरणासाठी कर्मचारी निवड पध्दत-
ऑनलाईन ‘कोवीन’ या संकेतस्थळावर लस दयावयाच्या कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड केली जाणार आहे. त्यातील नावांप्रमाणे 100 लोकांची एका केंद्रावर निवड केली जाणार आहे. दि.16 रोजी एकूण 9966 पैकी 500 कर्मचारी निवड लसीकरणासाठी होणार आहे. त्यातील निवडलेल्या व्यक्तींना मोबाईलवर संदेश पाठविला जाणार आहे. तसेच जिल्हा कक्षा कडून दूरध्वनीद्वारे लसीकरण ठिकाण व वेळ ही कळविली जाणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन नावे नोंदविल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना सूचना मिळतील त्यांनीच लसीकरण केंद्रावर उपस्थित रहावे. जर संदेश मिळाल्यानंतर एखाद्याला येणे शक्य नसेल तर त्याबाबतची माहिती आपल्या कार्यालयाकडे द्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित न येणाऱ्या कर्मचाऱ्याऐवजी पुढिल कर्मचाऱ्यांची निवड शुभारंभ दिनी करता येईल. यामध्ये सद्या शुभारंभ दिनी पुर्वी इतर आजार असलेल्या(Comorbid) कर्मचाऱ्यांना कोविड लस दिली जाणार नाही. पुढिल लसीकरणाच्या टप्प्यात त्यांना लस उपलब्ध केली जाणार आहे.

उद्या दि.14 रोजी मिनी मॉक ड्रीलही होणार –
दि. 16 रोजी होणाऱ्या 5 केंद्रावरील लसीकरणाआधी मिनी मॉक ड्रील प्रत्येकी 10 लाभार्थी या प्रमाणे दुपारी 1 तास होणार आहे. लसीकरण तयारी व प्रक्रिया याबाबत प्रात्याक्षिक घेतले जाणार आहे. यामध्ये जिंल्हा रुग्णालयात यापूर्वी मॉक ड्रील झाल्यामुळे पाच पैकी इतर चार ठिकाणी यामध्ये उपजिल्हा रुग्णालय अहेरी, आरमोरी, कुरखेडा व चामोर्शी या ठिकाणी उद्या मिनी मॉक ड्रील घेतली जाणार आहे.