गडचिरोली जिल्हा कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी महेंद्र ब्राम्हणवाडे यांची नियुक्ती

60

डॉ नामदेव उसेंडी यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस पद

गडचिरोली-

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा कांग्रेस मध्ये मोठे फेरबदल करण्यात आले.युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची जिल्हा कांग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर डॉ नामदेव उसेंडी यांना प्रदेश सरचिटणीस पदी बढती मिळाली आहे.आज अखिल भारतीय कांग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी 9 जिल्ह्यच्या अध्यक्षांची यादी जाहीर केली. त्यात महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नावाचा जिल्हाध्यक्ष म्हणून समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा कांग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे वाहत होते.ओबीसी चेहऱ्याकडे जिल्हा कांग्रेसची धुरा दिल्यास जिल्ह्यात पक्षाचा जनाधार वाढेल असा मतप्रवाह होता.महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस पदी नाना पटोले यांची निवड होताच महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्याकडे जिल्हा कांग्रेसचे अध्यक्षपद जाणार हे जवळपास निश्चित झाले होते. अखेर अपेक्षेप्रमाणे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

महेंद्र ब्राम्हणवाड़े पक्षाचा युवा चेहरा म्हणून परिचित आहे. त्यांनी एन एस यु आय पासून आपल्या राजकीय जीवनाची कारकीर्द सुरू केली.जिल्हा युवक कांग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना आपली एक नवी ओळख निर्माण केली.कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची दिल्लीनेही दखल घेतली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कांग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.तसेच पक्षांतर्गत गटबाजी ला रोखणे हेही सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे.