नागरिेकांनी स्वयंसहाय्यता गटांना पाठबळ देण्याची गरज :- कुमार आशीर्वाद
गडचिरोली, (जिमाका) दि.21 :- गडचिरोली जिल्हयातील महिला बचत गट उत्पादीत विविध 87 खाद्यपदार्थ व वस्तूंच्या विक्री केंद्राचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व अतिरीक्त पोलीस अधिक्षक समीर शेख यांचे हस्ते संपन्न झाला. जिल्हा परिषदेसमोरील गाळयामध्ये उमेद अंतर्गत जलधारा महिला प्रभाग संघ कोटगल- मुरखळा यांचे वतीने जिल्हा संकलन व विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. शुभारंभ प्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी कुमार आर्शीर्वाद यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले नागरिकांनी स्वयंसहाय्यता बचत गटांची विविध उत्पादने तसेच खाद्यपदार्थांची खरेदी करुन त्यांच्या व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे. जिल्हयातील होतकरु महिलांनी वेगवेगळया 87 प्रकारच्या वस्तू, साहित्य मेहनतीने तयार केले आहे. त्याची विक्री मोठया प्रमाणात झाली तर महिलांनी पाठबळ मिळेल व त्यांचा व्यवसायातील उत्साह वाढेल. या शुभारंभ कार्यक्रमावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फर्नेद्र कुत्तीरकर, माणिक चव्हाण, अमित तुरकर, चेतना लाटकर आदि मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांबरोबर विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी या विक्री केंद्रात भेटवस्तू , खाद्यपदार्थ खरेदी करावेत असे आवाहन समीर शेख यांनी केले. हस्त शिल्प, कडधान्य तसेच अहेरी येथील सोलर कंपनीच्या वस्तू या ठिकाणी सर्वांसाठी विक्रीस आहेत. पौष्टीक खाद्यपदार्थ, सेंद्रीय खाद्यपदार्थ , लाकडा पासून तयार केलेल्या विविध भेटवस्तू व सजावटीसाठी उपयोगी वस्तू या ठिकाणी महिला गटांमार्फत विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.
येणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑर्डरप्रमाणे दिवाळी खाद्य पदार्थही या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध राहणार असल्याचे चेतना लाटकर यांनी यावेळी सांगितले. गडचिरोली जिल्हयातील ज्या बचत गटांनी साहित्य उत्पादन केले आहे ते सर्व साहित्य या ठिकाणी खरेदीदारांसाठी उपलब्ध केले जाणार असल्याचे लाटकर यांनी यावेळी सांगितले.
अहेरी येथील सोलर प्रकल्पातील विविध दिवे, सोलर कीट याठिकाणी विक्रीस आहे. तसेच भामरागड , धानोरा परिसरातील बांबू , गवतापासून तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूही या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.