५० कोटींच्या निधीसह रामाळा उद्यानाचे हस्तांतरण करा मनपाच्या आमसभेत ठराव

58

चंद्रपूर, ता. ३० :- चंद्रपूरच्या नागरिकांना एक सुसज्ज असे पर्यटन स्थळ आणि निसर्गरम्य स्थळ उपलब्ध करून देण्यासाठी रामाळा तलाव उद्यान व तलावाचे व्यवस्थापन महसूल विभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचे प्रस्तावित आहे. रामाळा तलाव मोठ्या स्वरूपाचा असून, सध्यस्थितीत महानगरपालिका निधीतून तलावाचे सौंदर्यीकरण सुरक्षा इ. हाती घेणे शक्य नाही. त्यामुळे शासकीय योजनेतून सुमारे ५० कोटींचे अर्थसहाय उपलब्ध करून देण्यात यावे. आधी ठरलेल्या अटी व शर्तीनुसार रामाळा तलाव उद्यान व तलावाचे व्यवस्थापन महसुल विभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करून घेण्यास मंजुरी प्रदान करण्यात यावी, असा ठराव घेण्यात आला.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात ३० नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण आमसभा पार पडली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती होती. प्रारंभी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल सभागृहाने श्रद्धांजली वाहिली. सभेत मागील सर्वसाधारणसभेचे कार्यवृत्त वाचून पक्के करणे, महानगरपालिका हद्दीतील मुला-मुलींच्या गुणोत्तर प्रमाणाचा माहे मे २०२१ ते सप्टेंबर २०२१चा अहवाल सादर करण्यात आला.

यावेळी रामाळा तलाव उद्यान आणि तलाव व्यवस्थापन महसूल विभागाकडून मनपाकडे हस्तांतरित करण्याच्या विषयावर चर्चा झाली. रामाळा तलाव समितीची व्यवस्थापन बैठक दिनांक 23/08/2010 रोजी झाली होती. या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे रामाळा तलाव उद्यान व तलावाचे व्यवस्थापन तत्कालीन नगर परिषदेकडे हस्तांतरीत करण्यासाठी ठरले. याकरिता नगर परिषदने स्वतःची मालमत्ता वाढविण्यासाठी अनुकुल प्रस्ताव तयार करून उद्यान व रामाळा तलाव व्यवस्थापनाबाबत मंजुरीसाठी नगरपरिषदेचे सभेपुढे ठेवावा, असे नमुद होते. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी, चंद्रपूर यांचे दिनांक 20/11/2008 चे पत्रानुसार रामाळा तलावाचे कायमस्वरूपी व्यवस्थापन व इतर सर्व अधिकार हस्तांतरण करण्याचे संदर्भात विषय दिनांक 04/02/2009 चे सर्वसाधारण सभेपूढे ठेवण्यात आला. ठराव क्र 52 अन्वये तत्कालिन चंद्रपूर नगर परिषदेकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे व आर्थिक स्थितीचा विचार करता रामाळा तलाव तत्कालिन नगर परिषदेकडे हस्तांतरीत करणे शक्य नसल्यामुळे ठरावास मंजूरी प्रदान करण्यात आली नव्हती. त्यानंतर पुन्हा 28/12/2017 चे सर्वसाधारण सभेपूढे हा विषय ठेवण्यात आला. ठराव क्रमांक 74 अन्वये महसुल विभागाकडून सदर तलाव ( Water Body & Garden) महानगरपालिकेकडे मालकी हक्कासह हस्तांतरीत केल्यास महानरपालिकेला खाजगी भागीदारीतून रामाळा तलाव विकसीत करून घेवून चंद्रपूरच्या नागरिकांना एक सुसज्ज असे पर्यटन स्थळ उपलब्ध करून देता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये रामाळा तलाव महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करतात काही अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या होत्या. यात रामाळा तलावाची मालकी ही महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात यावी. रामाळा तलाव विकसित करण्याकरिता महानगरपालिकेला पूर्ण हक्क प्रदान करण्यात यावे. रामाळा तलावामध्ये विकसित केलेल्या बगीचासह तलाव सुध्दा हस्तांतरीत करण्यात यावा. बगीचा, तलाव व लगतचा परिसर हा विकसित करणे तसेच खाजगी कंत्राटदारास महानगरपालिका ठरवेल त्या अटी व शर्तीवर चालविण्याकरिता देण्याचे हक्क प्रदान करण्यात यावे, असे ठरले होते.

रामाळा तलाव मोठ्या स्वरूपाचा असून, महानगरपालिकेची सध्यस्थिती महानगरपालिका निधीतून तलावाचे सौंदर्यीकरण सुरक्षा इ. हाती घेणे शक्य नाही. त्यामुळे शासकीय योजनेतून सुमारे ५० कोटींचे अर्थसहाय उपलब्ध करून देण्यात यावे. आधी ठरलेल्या अटी व शर्तीनुसार रामाळा तलाव उद्यान व तलावाचे व्यवस्थापन महसुल विभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करून घेण्यास मंजुरी प्रदान करण्यात यावी, असा ठराव चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या ३० नोव्हेंबरच्या आमसभेत घेण्यात आला.