राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मोर्चा
दिनांक १ डिसेंबर २०२१ गडचिरोली
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कृषी पंपाचे वीज कनेक्शन खंडित करण्याचे काम सुरू करून त्यांचा छळ चालविला आहे. त्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू व्हावे यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली व धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा २ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांनी दिली आहे.
चामोर्शी तालुक्यात २९ नोव्हेंबरच्या शेतकरी मोर्चाला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद देत राज्य सरकारचा निषेध केला होता. गडचिरोली व धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यानी २ डिसेंबरला दूपारी २ वा. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.
राज्य सरकारने अजूनपर्यंत धानाला बोनस जाहीर केला नाही. अवाजवी व मनमानी पद्धतीने प्रचंड बिल आकारून शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे बिल वीज कनेक्शन कापण्याचे पाप हे सरकार करीत आहे. अवकाळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असतानाही त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. पात्र असूनही घरकूलासाठी लाभार्थ्यांची निवड केली नाही. यासह विविध मागण्याचा पूर्ततेसाठी आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली व धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत असून मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.