प्राणहिता पुष्कर मेळाव्या निमित्त गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून नियोजनाला सुरूवात

71

गडचिरोली, दि.03, जिमाका :- तेलंगणा महाराष्ट्र सीमेवर सिरोंचा येथे दर १२ वर्षांनी आयोजित होणाऱ्या प्राणहिता पुष्कर यात्रेबाबत जिल्हा प्रशासनाकडून नियोजनाला सुरूवात करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत जर मेळाव्याचे आयोजन झालेच तर प्रशासनाकडून सर्व आवश्यक उपाययोजना वेळेत उभ्या रहाव्यात या हेतूने जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आज संबंधित विभागांची बैठक घेतली. पुष्कर मेळावा हा दिनांक १३ ते २४ एप्रिल २०२२ दरम्यान कालेश्वरम तेलंगणा – सिरोंचा या भागात आयोजित होणार आहे. त्यादृष्टीने येणाऱ्या लाखो भाविकांची व्यवस्था करणे तसेच अनुषंगिक व्यवस्था करणेसाठी काय काय करावे लागेल याबाबत सर्वेक्षण व नियोजनाचे आदेश त्यांनी प्रशासनातील विविध विभागांना दिले. यावेळी बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अति.पोलीस अधीक्षक समीर शेख, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, संबंधित तालुकास्तरावरून उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

जर मेळाव्याचे आयोजन झालेच तर भाविकांसाठी लागणारी नदीघाटावरील जागा तयार करणे, स्वच्छतागृह तयार करणे, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था तसेच इतर आवश्यक नियोजनासाठी लागणारी मदत याबाबत तयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिल्या. तसेच तेलंगणा प्रशासनाशी समन्वय साधून नियोजन करणे, मंदिर व्यवस्थापकांशी संवाद साधून भाविकांचा येण्याजाण्याचा मार्ग निश्चित करणे याबाबतही नियोजन केले जाणार आहे. यापुर्वी सन २०१० साली झालेल्या पुष्कर मेळाव्यात तेलंगणातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी सिरोंचा येथे पुल नव्हता. आता येण्याजाण्यासाठी पुलाची व्यवस्था असल्याकारणाने सिरोंचाकडे जास्त भाविक येण्याची शक्यता आहे. साधारण ५ लक्ष भाविकांच्या हिशोबाने सदर मेळाव्याचे आयोजन होवू शकते असा अंदाज व्यवस्थेसाठी गृहित धरण्यात आला आहे.