बर्ड फ्ल्यु…भिती नको, काळजी घ्या – जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

123

बर्ड फ्ल्यु…भिती नको, काळजी घ्या – जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

बर्ड फ्ल्युच्या अनुषंगाने घ्यावयाच्या काळजी बाबत मार्गदर्शक सूचना जारी

गडचिरोली : बर्ड फ्ल्यु आजार पक्षांपासून थेट माणसांत होण्याची शक्यता खूपच कमी असून त्या विषयी भिती नको पण काळजी घ्यावी अशा आशयाच्या सूचना गडचिरोली जिल्हयाचे पशुसंवर्धन अधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत. गडचिरोली जिल्हयामध्ये फुले वार्ड, गडचिरोली येथील काही कोंबडया मध्ये मरतुक आढळुन आली व त्यांचे नमुणे बर्ड फ्ल्यु तपासणी करीता प्रयोग शाळेत तपासणी करीता पाठविण्यात आलेले आहेत. सदर नमुण्यांचा तपासणी अहवाल होकारार्थी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन फुले वार्ड, गडचिरोली पासुन 10 कि.मी. त्रिज्येतील परीसर सतर्कता भाग म्हणुन जिल्हाधिकारी यांचेकडून पत्राद्वारे यापुर्वीच घोषीत करण्यात आला आहे.

तरी नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे की, बर्ड फ्ल्यु रोगाबद्दल कोणतीही भिती न बाळगता दिलेल्या सुचनांचे पालन करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या परीसरात पक्ष्यांची असाधारण मरतुक आढळल्यास नजिकच्या पशुसंवर्धन विभागाशी त्वरीत संपर्क साधावा असे जिल्हयाचे पशुसंवर्धन अधिकारी यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

अशी घ्या बर्ड फ्लयू बाबत काळजी : शिजवलेली अंडी व चिकन मांस पूर्ण सुरक्षित असून पूर्ण 30 मिनिटे शिजवलेले अंडी व चिकन मांस खाणे पूर्णत: सुरक्षित आहे. कच्चे चिकन मांस व कच्चे अंडी खाऊ नका. चिकन विकत घेतांना विक्रेत्याकडील पक्षी संथ, आजारी नाहीत याची खात्री करा. आपल्या परिसरात कावळा, बगळा, कबुतर इत्यादी पक्षी मृत अवस्थेत आढळल्यास त्याला स्वत: हात लावू नका, ग्रामपंचायत किंवा मनपाला कळवा. बर्ड फ्ल्यु आजार पक्षांपासून थेट माणसांत होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

कुक्कुट पालनामध्ये बर्ड फ्लयू बाबत काळजी : परिसरातील कुक्कुट पालनामध्ये आपल्या पोल्ट्रीमधील पक्षांचा स्थलांतरीत पक्षांशी संपर्क टाळावा, पक्ष्यांच्या पाण्याची व खाद्याची भांडी दररोज स्वच्छ धुणे आवश्यक, कुक्कुट पक्ष्यांच्या खुराड्यात स्वच्छता ठेवा, आपल्या पक्षांना नियमितपणे लसीकरण करुन घ्या, आपलेकडील पक्षी आजारी पडल्यास किंवा मरतुक झाल्यास त्याची माहिती तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकिय अधिकाऱ्यास द्या. आपला कुक्कुट पक्ष्यांची विष्ठा व नाकातील स्त्राव यांसोबत संपर्क येऊ देऊ नका. पक्षांना शक्यतो हाताळु नका. हाताळल्यास हात साबणाने स्वच्छ धुवा. आपल्या पक्ष्यांचे पाणी व खाद्य घराबहेर उघड्यावर ठेऊ नका. परिसरात इतर प्रजातीचे पक्षी / प्राणी येणार नाही, याची काळजी घ्या.

कुक्कुट मांस, अंडी विक्रत्यांनी घ्यावयाची काळजी  : चिकन विक्रत्यांनी मांस, हँड ग्लोज आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. दुकानातील पक्षी ठेवण्याच्या खुराड्याची नियमित साफसफाई ठेवा. दुकानाचा परिसर सॅनिटायझरने फवारणी करून निर्जंतुक करा. परिसरातील उडलेले पक्ष्यांचे पंख फ्लेम गनने जाळून घ्या. फार्मवरुन आजारी पक्षी आणणे टाळा. वेस्ट मटेरियल प्लॅस्टीक बॅगमध्ये बंदीस्त करून पुरुन टाका. दुकान बंद करतांना सर्व उपकरणे स्वच्छ करण्याची तसेच दुकानाचे निर्जंतुकीकरण करण्याची दक्षता घ्यावी.