कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मिळणे करिता ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आवाहन जिल्ह्यात 249 अर्ज दाखल, पैकी 212 अर्जांना मंजूरी तर 45 अर्जांचा निधी वर्ग करण्यासाठी प्रक्रिया सुरु

57

गडचिरोली :- कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान म्हणून निधी शासनाकडून देण्यात येत आहे. त्याकरिता शासनाने पोर्टल सुरू केले असून जिल्ह्यातील पात्र वारसदारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कक्षाकडून करण्यात आले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 249 जणांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी 212 अर्जांना जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. तसेच त्यामधील 45 अर्जांची अंतिम मंजुरी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले असून त्यांनाही सानुग्रह निधी लवकरच वर्ग करण्यात येणार आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही मोठ्या प्रमाणात अर्ज येणे बाकी असल्याकारणाने पात्र वारसदारांनी लवकरात लवकर अर्ज पोर्टल वरती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर, 2021 रोजी प्रसारीत केला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले असून, याद्वारे कोव्हिड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in वा https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर लिंक देण्यात आली आहे.
अर्जदाराने, सदरील लिंकवर संबंधित आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास जिल्हास्तरीय स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे.
तरी नागरिकांनी आवाहन करण्यात येते की, कोविड-19 साथरोगामुळे मृत्यु प्रकरणी संबंधितांनी वरील लिंक वर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावे. याकरिता कोणत्याही कार्यालयात ऑफलाईन अर्ज करण्याची गरज नाही याची नोंद घ्यावी.