अपघात व धुळीपासून जनतेला होणारा त्रास लक्षात घेता लोहखनिजाची वाहतूक दिवसा बंद करावी यासाठी आष्टी, मार्कंडा कंसोबा, व अनखोडा ग्रामपंचायतीनी घेतला ठराव.
प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा
आष्टी- (गडचिरोली) लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची संख्या वाढली असल्यामुळे व या वाहतूक होणाऱ्या लोहखनिजाच्या धुळीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही वाहतूक दिवसा बंद करण्यात यावी मुख्य मागणीसह इतर मागण्या संदर्भात आष्टी, अनखोडा व मार्कडा कंसोबा ग्रामपंचायतीनी ठराव घेऊन याविरोधात कारवाई करण्यासाठी आष्टी पोलीस ठाण्याला निवेदन दिले.
सुरजागड पहाडीवरील लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव व ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रक मुळे आलापल्ली-आष्टी मार्गावर अपघाताच्या प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.या वाहनांमुळे रस्त्याची चाळण झाल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना नरकयातना भोगाव्या लागत आहे. दररोज 500 ते 600 ट्रक ये-जा करीत असल्यामुळे सार्वजनीक वाहतूक व्यवस्था वारंवार ठप्प पडत आहे.त्यामुळे या वाहनांची वाहतूक दिवसा बंद करावी व ती रात्री 8 ते सकाळी 6 पर्यन्त सुरू करावी, लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर ताडपत्री झाकून नसल्यामुळे व माल ओव्हरलोड असल्यामुळे धुळीचे कण मोठ्या प्रमाणात उडत असतात त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे या वाहनांवर ताडपत्री झाकण्याची सक्ती करा,ही वाहने मुख्य रस्त्यालगत,वर्दळीच्या ठिकाणी व शाळा ग्रामीण रुग्णालयाच्या लगतच्या परिसरात उभी राहत असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी,सायकलस्वार,दुचाकी चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे करीता वरील ठिकाणच्या परिसरात वाहने उभी करण्यास मनाई करा य यासंबंधी आष्टी, मार्कंडा व अनखोडा ग्रामपंचायतीनी ठराव घेऊन निवेदनाद्वारे आष्टी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कुंदन गावडे यांच्याकडे मागणी केली. तसेच यासबंधी कोणतीही कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला.
लोहखनिजाच्या वाहनांमुळे होणाऱ्या जाचक त्रासाला कंटाळून या तिन्ही ग्रामपंचायती एकवटल्या व वरील बाबीसंबंधी एकमुखी मागणी केली. व यासबंधी चे निवेदन तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना देणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी आष्टी ग्रामपंचायतीच्या वतीने आष्टी ग्रामपंचायतीच्या सरपंच बेबीताई बुरांडे, ग्रामपंचायत सदस्य कपिल पाल, संतोष बारापात्रे, अनखोडा ग्रामपंचायतीच्या वतीने, सरपंच रेखाताई येलमुले,उपसरपंच वसंत चौधरी, मार्कडा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच वनश्री चापले,ग्रामपंचायत सदस्य भारती पोटवार, ग्रामपंचायत सदस्य विजय बहिरेवार, ग्रा.प. सदस्य नंदू सिडाम,प्रभाकर लोणारे, सुरेश मोहूर्ले, साईनाथ कुळमेथे,अन्वर सय्यद, पंकज येलमुले,संजय भोयर आदी उपस्थित होते.