वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील
५०० कोविड योद्ध्यांचे उद्या ‘भिक मागो’ आंदोलन
६ महिन्यांचा थकित पगार देणार नाही तोपर्यंत कोरोनाची लस घेणार नाही – कामगारांचा निर्धार
चंद्रपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कंत्राटी कामगारांचे मागील ६ महिन्यांपासून पगार थकीत आहेत.तसेच वैद्यकीय महाविद्यालयात काम करणार्या कंत्राटी कामगारांनी मार्च २०१९ मध्ये बेमुदत उपोषण केल्यानंतर त्यांना शासनाने किमान वेतन मंजूर केले होते. परंतु तात्कालीन अधिष्ठाता डॉ.एस.एस. मोरे यांनी निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्यामुळे कामगारांना मागील दोन वर्षापासून किमान वेतन लागू झालेले नाही. डॉ. मोरे यांच्याविरुद्ध जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने तीन वेळा कारवाई प्रस्तावित करूनही त्यांच्याविरुद्ध वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे ५०० कंत्राटी कामगारांना मागील दोन वर्षापासून लागू झालेले किमान वेतन मिळत नसल्याने तसेच सहा महिन्यांपासून पगार थकीत असल्याने कामगारांमध्ये मोठा असंतोष आहे. कामगारांच्या रास्त मागण्यांसाठी जन विकास कामगार संघाने अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील प्रशासनाच्या सर्वच पातळीवर अनेकदा लेखी व तोंडी पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळालेला नाही.
त्यामुळे जन विकास कामगार संघाने आता आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. ६ महिन्यांचा थकीत पगार देण्यात यावा तसेच दोन वर्षापूर्वी मंजूर झालेले किमान वेतन तातडीने लागू करण्यात यावे या मागण्यांसाठी उद्या दिनांक २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता गांधी चौक, चंद्रपूर येथून भीक मागो आंदोलन सुरू होणार आहे.एक दिवस ‘काम बंद’ करून सर्व कामगार ‘भीक मागो’ आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.पुढील सात दिवसात कंत्राटी कामगारांना त्यांचे सहा महिन्याचे थकीत वेतन देण्याची तसेच किमान वेतन लागू करण्याची मागणी मंजूर न झाल्यास कामगारांचे आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी माहिती जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे.