विवाह सोहळ्यातून दिला ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा विषयी जनजागृती*

74

विवाह सोहळ्यातून दिला ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा विषयी जनजागृती*

 

लग्न सोहळा म्हटला की आकर्षक मंडप आणि सजावट केली जाते. हे सर्व करताना जनजागृती व्हावी, या दृष्टीने चंद्रपुरातील एका विवाह सोहळ्यात ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला. या सोहळ्याची लग्नपत्रिका आगळीवेगळी तर होतीच लग्न सोहळ्यात चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वैभव सांगणारी प्रतिकृती देखील आकर्षक ठरली.

 

सुनील मिलाल आणि श्रुती असे या नवदांपत्याचे नाव असून, त्याचा विवाह सोहळा 17 डिसेंबर रोजी हिरई नदीजवळील एका सभागृहात पार पडला.

सुनील हा इको प्रो पर्यावरण प्रेमी संस्थेचा कार्यकर्ता असून, त्याने चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. यातूनच मिळालेल्या प्रेरणेतून त्याने आपल्या लग्न पत्रिकेत चंद्रपूर शहरातील सर्व ऐतिहासिक वर्षांचे जतन व्हावे, यासाठी पत्रिकेमध्ये शहरातील सर्व ऐतिहासिक स्थळांचे छायाचित्र आणि जनजागृती करणारी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूरच्या गोंडकालीन वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या परकोटाची इको प्रो सदस्य संजय सब्बनवार यांनी कोरलेली प्रतिकृती विवाह सोहळ्याच्या दर्शनी भागात ठेवण्यात आली होती. चंद्रपूर शहरांमध्ये प्राचीन आणि गोंडकालीन काळातील अनेक वास्तू आजही आहेत. त्या जिवंत राहिल्या पाहिजेत, यासाठी इको- प्रो च्या ‘आपला वारसा, आपणच जपूया’ ही संकल्पना शहरातील सर्व नागरिकांमध्ये रुजवण्याची आज गरज आहे. हा संदेश नातेवाईकांच्या आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून पोहोचण्याच्या दृष्टीने पत्रिकेच्या रूपाने आणि किल्ला- परकोट प्रतिकृतीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे, असे सुनील मिलाल यांनी सांगितले.

 

“आपला वारसा, आपणच जपुया” या अभियान अंतर्गत प्रत्येक व्यक्तीचा सहभाग अपेक्षित असून, आपल्या विवाह प्रसंगी केलेली जनजागृती उल्लेखनीय आहे.

– बंडू धोतरे, इको प्रो