*विदर्भातील वन्यजीव मानव संघर्ष थांबविण्यासाठी व्यापक उपाययोजना करा : खासदार बाळू धानोरकर*
*अन्यथा वन विभागाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन*
चंद्रपूर : देशात सर्वाधिक वाघांची संख्या विदर्भात असून, मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. दरवर्षी सरासरी शेकडो व्यक्तींचा वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू होत आहे. विदर्भातील वन्यजीव मानव संघर्ष थांबविण्यासाठी व्यापक उपाययोजना व्हावी अशी मागणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी शासनाकडे केली आहे. मागील वर्षभरात चंद्रपूर जिल्ह्यात ४७ ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याच्या घटना गंभीर आहेत.वाघांच्या मानवी वसाहतील मुक्त संचारावर आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेऊन व सूचना देऊनही अगदी काल परवापर्यंत वाघबळी सुरूच आहेत. हि अत्यंत खेदाची बाब आहे. यामुळे वनविभागाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढलेली आहे, यासोबतच मानव व पाळीव जनावरांवर हल्ले देखील मोठया प्रमाणात सुरु आहे. हे हल्ले थांबविण्यात वनविभागाला अपयश येत आहे. जंगलात हल्ले झाले तर वनविभाग दोषी नाही. मात्र गावांमध्ये , मानवी वसाहतींमध्ये येऊन दहशत सुरु असल्याने कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे.
त्यासोबतच वाघांचा बंदोबस्त करण्याचे अधिकार वरिष्ठ पातळीवरील अधिका-यांकडून काढून त्वरीत जिल्हा प्रशासन व जिल्हा स्तरीय वनविभागाला द्यावेत, जैवविविधतेतील मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी विकसनशील देशांसारखे जैवविविधता समृद्ध करण्यासाठी ग्रामसभांचा माध्यमातून विकास आराखडा तयार करणे, ग्रामसभेच्या माध्यमांतून पारंपारिक पध्दतीने लोक समुदायाकडून वन्यजीवांचे संरक्षण करणे, वनहक्क कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे (कलम 5 नुसार) अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियम 2006 व 2008. वनहक्क कायद्यानुसार लोकसमुदायाचे वनावरील अधिकार कायम करणे, वाघांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणा-या वन्यजीव प्रजातीचे संवर्धन करणे. (कोल्हे, लांडगे, रानकुत्रे), वाघांवर नियंत्रण ठेवणे (संख्येवर) साठी अभ्यास प्रशिक्षण व कृती आराखडा, वन्यजीवांचे नैसर्गिक भ्रमण मार्ग ठेवणे. (कृत्रीम तलाव, रिसॉर्ट), नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करणे या उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या आहे.