उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा- प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

48

*उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा- प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*

 

गडचिरोली,(जिमाका)दि.17:उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णपतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात यावे. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ,टि.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. सर्व संबंधित विभाग,स्थानिक पुढारी व सामाजिक संस्था यांनी सदर कार्यात सामील व्हावे. जिल्हा नियंत्रण कक्ष/महानगर पालिका नियंत्रण कक्ष/विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रित कार्य करावे.

काय करावे :-

तहान लागलेली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.हलकी, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/हॅट,बुट व चप्पलाचा वापर करण्यात यावा,प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस.घरी बनविण्यात आलेली लस्सी,आंबील,लिंबुपाणी, ताक इत्यादीचा वापर करण्यात यावा.अशक्तपणा, स्थुलपणा,डोकेदुखी,सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा,गुरांना छावणीत ठेवण्यात यावे,तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.घर थंड ठेवण्यासाठी पडदे,शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे,ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा.तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे,पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा,तसेच बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा. जर गरोदर वा आजारी असाल तर अधिकची काळजी घेण्यात यावी.

काय करु नये-

लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या वा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.गडद,घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे,बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे.तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. तसेच आकस्मिक संपर्क करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली 07132-222191/108 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्यात यावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मु.का.अ.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,गडचिरोली यांनी कळविले आहे.

****