विकास कामे गुणवत्तापुर्वक व वेळेत पुर्ण करा : पालकमंत्री एकनाथ शिंदे
जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
यावर्षी 2020-21 साठी सुधारीत अर्थसंकल्पित 439.74 कोटींची तरतूद
पुढिल वर्षीच्या 2021-22 साठी प्रारूप आराखडयात 356.39 कोटी प्रस्तावित तर अतिरीक्त मागणी 510.18 कोटींची
येत्या 8 फेब्रुवारीला प्रारूप आराखड्यावर मुंबई येथे बैठक
मागील वर्षी सन 2019-20 मध्ये 99.68 टक्के म्हणजेच 480.83 कोटी झाला खर्च
पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न
गडचिरोली,(जिमाका)दि.30 :- पालकमंत्री तथा नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या सभागृहात पार पडली. यावेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करण्याचे तसेच त्यानिधीतून गुणवत्तापूर्ण काम कसे होईल याबाबत अधिकाऱ्यांना लक्ष घालून काम करावे असे निर्देश दिले. कोरोना काळात निधी बाबत प्रश्न निर्माण झाले होते मात्र आता शंभर टक्के निधी जिल्हा वार्षिक मधू वितरीत करण्यात आला आहे. मंजूर कामे करण्यासाठी वेळ कमी असला तरी ती वेळेत पुर्ण करताना कोणत्याही प्रकारे गुणवत्तेमध्ये बदल करता कामा नये अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. यावर्षी 2020-21 साठी सुधारीत अर्थसंकल्पित 439.74 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 38 टक्के खर्चही झाला आहे. पुढिल वर्षीच्या प्रारूप आराखडयावर या बैठकित चर्चा झाली. पुढिल वर्षासाठी 356.39 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत तर अतिरीक्त मागणी 510.18 कोटींची आहे. याबाबत जास्तीत जास्त निधी जिल्हयासाठी मिळवून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी बैठकित आश्वासन दिले. येत्या 8 फेब्रुवारीला प्रारूप आराखड्यावर मुंबई येथे बैठक लावण्यात आली असून शासनाकडून निश्चितच आकांक्षित गडचिरोली जिल्हयासाठी जास्तीचा निधी मंजूर करून घेवू असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. मागील वर्षी सन 2019-20 मध्ये 99.68 टक्के म्हणजेच 480.83 कोटी झाला खर्च झाला असून यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. आज उपस्थितामध्ये प्रधान सचिव, नगरविकास महेश पाठक, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शिवाद, सर्वश्री आमदार धर्मराव आत्राम, कृष्णा गजबे, डॉ.देवराव होळी, रामदास आंबटकर, अभिजीत वंजारी, प्रकल्प अधिकारी मनोज जिंदाल व आशिष येरेकर उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा वार्षिक आराखडयाचे सादरिकरण जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी केले.
विविध विकास कामांचे लोकर्पण : गडचिरोली जिल्हयातील आरमोरी प्रशासकीय इमारत, बाल रुग्णालय, आरमोरी, उपविभागीय व तहसिल कार्यालय कुरखेडा, मायक्रो एटिएम इ. कामांचे लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने पार पडले. यावेळी त्यांनी जिल्हयातील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या कामांची प्रशंसा पालकमंत्र्यांनी केली. आरमोरी व कुरखेडा मधील सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आली आहेत.
****