‘जातीव्यवस्थेचे निर्मुलन’ या पुस्तकाचे वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी विचारज्योत फाऊंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

25

‘जातीव्यवस्थेचे निर्मुलन’ या पुस्तकाचे वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 

विचारज्योत फाऊंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

 

चंद्रपूर – विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपूर तर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून धनोजे कुणबी समाज मंदिर, लक्ष्मीनगर, चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जातीव्यवस्थेचे निर्मूलन’ या प्रसिद्ध पुस्तकाचे मोफत वितरण करून जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

 

एकीकडे समाजामध्ये जयंती, उत्सव, आनंदाचे सोहळे असल्यावर तरुणाई डिजेच्या तालावर नाचताना दिसते. त्यामुळे ही पिढी नाचण्यापेक्षा वाचणारी व्हावी, महापुरुषांचे विचार तरुणाईच्या डोक्यामध्ये जावे या आशावादी हेतूने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज पी. दहागावकर यांच्या पुढाकारातून विचारज्योत फाऊंडेशन तर्फे हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वानाच ‘जातीव्यवस्थेचे निर्मूलन’ हे पुस्तक सस्नेह भेट देण्यात आले.

 

पुस्तके वितरीत करण्याचा उपक्रम हा कौतुकास्पद असून येणाऱ्या काळात स्वतःच्या मेंदूने विचार करणारी तरुण पिढी तयार व्हावी हा आशावाद ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. पुढे त्यांनी देशातील वर्तमान परिस्थिती सांगत असताना पुस्तके वाचण्याचे आणि ज्ञानाचे महत्व उपस्थितांना सांगितले.

 

यावेळी विचारज्योत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरज पी. दहागावकर, धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगर चंद्रपूरचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके, प्रा. नामदेव मोरे, अतुल देऊळकर, विचारज्योत फाऊंडेशनचे मुन्ना तावाडे, आकाश कडूकर, प्रलय म्हशाखेत्री, विशाल शेंडे, प्रा. विजय मुसळे, श्याम म्हशाखेत्री, कैलास दुर्योधन आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी, महिला व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.