*‘गर्जा महाराष्ट्र माझा’ने चंद्रपूरकरांची मने जिंकली!* *100 नवोदित कलावंतांचा सहभाग : स्पार्क जनविकास फाऊंडेशनचा शुभारंभ*

25

*‘गर्जा महाराष्ट्र माझा’ने चंद्रपूरकरांची मने जिंकली!*

*100 नवोदित कलावंतांचा सहभाग : स्पार्क जनविकास फाऊंडेशनचा शुभारंभ*

*चंद्रपूर, ता. ३ :* नवोदित कलावंतांना कलामंच उपलब्ध करून देणे या उद्देशातून महाराष्ट्रीयन संस्कृती, परंपरेचे दर्शन घङविणाऱ्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या 100 कलावंतांचा सहभाग असलेल्या कलाविष्काराचे सादरीकरण नुकतेच चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात झाले. सण, संस्कृती, मराठी माणसाची दिनचर्या आदी सादरीकरणाने चंद्रपूरकरांची मने जिंकली.

स्पार्क जनविकास फाऊंडेशनच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पार्क जनविकास फाऊंडेशनचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. आमदार किशोर जोरगेवार, भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राज्य परिवहन मंडळाच्या चंद्रपूर विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी नवीन कलावंतांना मंच मिळण्याची गरज व्यक्त केली. नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सदैव तत्पर असतो. त्यामुळे भविष्यात या कलावंतांना संधी मिळण्याच्या दृष्टीने आपण पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी नवोदित कलावंतांना तयार करणाऱ्या स्पार्क जनविकास फाऊंडेशनचे कौतुक केले. 100 कलावंतांना सोबत घेऊन कार्यक्रम उभारणे, सोपे काम नसल्याचे सांगत अशा कलावंतांसोबत आपण नेहमी उभे राहू, असे आश्वासन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी कलावंतांमधील ऊर्जेचा उल्लेख करत विविध क्षेत्रात कार्यरत असतानाही तालीम आणि कार्यक्रम सादर करणाऱ्या स्त्रियांचा गौरवोल्लेख केला.

‘गर्जा महाराष्ट्र माझा’च्या जडणघडणीत सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे, चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सुनील तिवारी, श्री आनंद नागरी सहकारी बँक, श्री कन्यका नागरी सहकारी बँकेचे प्रतिनिधी, राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वरकड, शेअर मार्केट क्लासेसचे संचालक टिकमचंद डोहणे आदींचा यात समावेश होता. फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. विजय मोगरे यांचेही यावेळी सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.

तत्पूर्वी आमदार किशोर जोरगेवार व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रिमोटची कळ दाबून स्पार्क जनविकास फाऊंडेशनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्व संचालकांचा परिचय करून देण्यात आला. उद्‌घाटन कार्यक्रमाचे संचालन आशीष देरकर यांनी केले.

यानंतर प्रज्ञा नागपुरे-जीवनकर दिग्दर्शित ‘गर्जा महाराष्ट्र माझा’चे सादरीकरण करण्यात आले. चंद्रपूर रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत सादर झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. मराठी माणसाची दिनचर्या, गुढीपाडवा, पोळा, गणपती, दिवाळी, मंगळागौर,जन्माष्टमी, होळी तीळसंक्रांत या सणांबरोबरच परंपरा, संस्कार आदींचे दर्शन घडविले. संगीत संयोजन नंदराज जीवनकर यांचे होते. नृत्य दिग्दर्शक मृणालिनी खाडीलकर-गंगशेट्टीवार, सहायक दिग्दर्शक अविनाश दोरखंडे हे होते. ज्येष्ठ दिग्दर्शक हरिश इथापे, संजय वैद्य, प्रदीप खांडरे, गोलू बाराहाते हे मार्गदर्शक होते.