कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पात स्थानिक युवकांना प्राधान्य व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी स्थानिक करणार आंदोलन
चामोर्शी –
कोनसरी येथील लोह खनिजावर आधारित उद्योग प्रकल्पात कोनसरी लगत असणाऱ्या गावातील स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य देण्यात यावे व अन्याय ग्रस्त शेत जमीन मालकांना न्याय देण्यात यावा यासाठी कोनसरी परीसरातील स्थानिकानी 3 जून रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यापूर्वी या मागण्याचे निवेदन दिनांक 5 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली, तहसिलदार चामोर्शी, व कोनसरी येथील कंपनी प्रशासनाला दिले. व या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आता या मागण्यांची योग्य दखल न घेतल्याने स्थानिकांनी आंदोलनं करणार असल्याचे सांगीतले.
कोनसरी ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील लॉईड्स मेटल्स एनर्जी लिमिटेड च्या लोहखनिज प्रकल्पात स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य देणार असल्याची हमी कंपनी प्रशासनाने दिली होती. यामुळे कोनसरी परिससरातील आष्टी, अनखोडा, उमरी, चंदनखेडी, कडोली, जैरामपुर, मुधोली , रामपूर, सोमणपल्ली, रामकृष्णपुर, येनापूर, लक्ष्मणपुर धर्मपुर, बहादूर, गणपुर, इल्लुर, ठाकरी, मार्कंडा कंसोबा, व परिसरातील अन्य गावातील अनेक आय टी आय व ईतर बेरोजगार युवकामध्ये रोजगाराबाबत आशेचे किरण निर्माण झाले होते. परंतू प्रत्यक्षात मात्र परिसरातील बेरोजगार युवकांना भरतीत कुठल्याही प्रकारचे प्राधान्य न देता बाहेर जिल्ह्यांतील व राज्यातील कामगारांना रोजगार दिल्या जात आहे. ही स्थानिक जनतेची दिशाभूल असून याविरोधात स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. या कंपनीतील रोजगार भरतीत परिसरातील स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगारात डावलण्याचा असाच प्रयत्न होत आहे .तसेच परिसरातील जमिनीचे अधिग्रहनाच्या प्रक्रिया करताना स्थानिक जमीन मालकाशी कोणतीही चर्चा न करता काही मध्यस्था मार्फत दिशाभूल करण्यात आली व जमिनीचा व्यवहार करण्यास ग्रामस्थांचा होकार असल्याचे या पत्रात नमूद केले. ही एक प्रकारची स्थानिक जमीन मालकांची फसवणुक असून जमीन मालकांना विश्वासात न घेता असा प्रकार घडू नये.स्थानिक युवकांना रोजगार देण्याच्या हमीचे कंपनी प्रशासनाने पालन करून
परीसरातील स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य देण्यात यावे
जमिनीची अधिग्रहण प्रक्रिया पार पाडताना जमीन मालकांशी मद्यस्थामार्फत चर्चा न करता थेट चर्चा करण्यात यावी
अधिग्रहण करण्यात येणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला देण्यात यावा.या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना तुटपुंजे वेतन न देता पगारवाढ करण्यात यावी.
दिशाभूल व फसवणूक करुन जमीन अधिग्रहण करू नये. या न्याय मागण्या मान्य करण्यात येऊन स्थानिकांना न्याय देण्यात यावा या मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला. पुन्हा एकदा स्थानिकांनी या मागण्यांचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांच्याकडे दिले. तसेच लोहखनिजाची अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना अनखोडा येथील उपसरपंच वसंत चौधरी, छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टीचे अध्यक्ष पवन रामगिरकर, सचिव संदिप तीवाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नेमाजी घोगरे, कढोली चे सरपंच जितेंद्र हुलके, जैरामपुर चे माजी उपसरपंच हरेश नीखाडे, उमरीचे राहुल कुमरे आदी उपस्थित होते.