_*गोव्यात ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावरील ‘सी-२० परिषद

56

_*गोव्यात ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावरील ‘सी-२० परिषद’ !*_

 

*भारत विश्वगुरु आणि महासत्ता होण्यासाठी प्रत्येक भारतियाचा सहभाग आवश्यक !* – गोविंद गावडे, सांस्कृतिक मंत्री, गोवा

 

दाबोळी (गोवा) – ‘जी-२०’ राष्ट्रांचे अध्यक्षपद भारताला लाभणे ही ऐतिहासिक गोष्ट आहे. भारताने विश्वाला योग, आयुर्वेद आदी दिलेली देणगी आहे. भारताला संगीत, नृत्य, कला, साहित्य, चित्र, शिल्प आदींचा मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. याची सर्वांसोबत आदानप्रदान होणे आवश्यक आहे. भारत हा आता केवळ विकसनशील देश नव्हे, तर विकसित आणि महासत्ता म्हणून विश्वात उदयास येत आहे. भारताच्या या नवनिर्माणामध्ये आणि भारतला विश्वगुरुपदी विराजमान होण्यासाठी प्रत्येक भारतियाचा सहभाग आवश्यक आहे, असे आवाहन *गोवा राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री श्री. गोविंद गावडे* यांनी केले. ते ‘गोवा शासन’, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ आणि ‘भारतीय विद्या भवन, नवी दिल्ली’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘सी-२० परिषदे’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. दाबोळी, वास्को, गोवा येथील ‘राजहंस नौदल सभागृह’ येथे आयोजित ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावरील ‘सी-२० परिषदे’ला देश-विदेशांतून आलेले मान्यवर आणि 350 हून अधिक तज्ञ व्यक्ती उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचा प्रारंभ गोव्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. गोविंद गावडे, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’च्या अध्यक्षा आणि ‘सी-२०’ परिषदेच्या आंतरराष्ट्रीय समन्वयक प्रा.डॉ. शशीबाला, ‘सिंगापोर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या मंडळाचे सदस्य श्री. मनीष त्रिपाठी, हिंदी सिनेअभिनेत्री तथा लेखिका पूजा बेदी, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या शोध समन्वयक सौ. श्वेता क्लार्क आणि ‘स्पिरिच्युएल सायन्स रिसर्ज फाऊंडेशन’ या संकेतस्थळाचे संपादक श्री. शॉर्न क्लार्क यांच्या हस्ते कयपंजीने दीपप्रज्वलन करून झाला. या वेळी ‘सी-20 परिषदे’च्या प्रा. डॉ. शशीबाला यांनी ‘सी-२० परिषदेचे’चे मानचिन्ह असलेले दोन ध्वज ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या सौ. श्वेता क्लार्क आणि श्री. शॉन क्लार्क यांना सुपुर्द केले. या वेळी सांस्कृतिक मंत्री श्री. गावडे यांच्या हस्ते ‘सी-२०’ परिषदेचा ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’चा संदेश देणारा संगीतमय व्हिडिओचे लोकार्पण करण्यात आले.

 

*आपण जगाला ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या ध्येयापर्यंत घेऊन जाऊया ! – प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा*

यानंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला. त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘जागतिक शांतता आणि जागतिक विकास या दृष्टीने गोव्यात होणार्‍या ‘जी-20’च्या बैठका या गोमंतकियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारत ही जगाची आध्यात्मिक राजधानी असल्याने ती ‘जी-20’ राष्ट्रांना ‘एकता, समृद्धी आणि समावेशकता’ या दिशेने घेऊन जाणार आहे. भारतभरात या परिषदांच्या माध्यमातून आरोग्य, विकास, पर्यटन, ‘एनर्जी’, ‘स्टार्ट-अप’ आदी विविध विषयांवर बैठका होत आहेत. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगाचे नेतृत्व करू लागला आहे. ‘सी-२० परिषदे’च्या माध्यमातून आपण जगाला ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ या ध्येयापर्यंत घेऊन जाऊया.’’

 

*श्रद्धावान आणि अश्रद्ध यांच्यामध्ये जगाचे विभाजन करता कामा नये ! – प्रा. डॉ. शशीबाला*

आज जगामध्ये संघर्ष, आतंकवाद आणि गोंधळ यांचे वातावरण आहे. मनुष्य हा निसर्गाचा मालक बनला आहे. साम्यवाद, भांडवालवाद आणि व्यापारीवाद यांमुळे जगभरात अनादर, तसेच विशिष्ट वर्गांना बहिष्कृत करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. जगात वाढलेला हा संघर्ष त्याग, तप, करुणा आणि प्रेम यांनी नष्ट होऊ शकतो. भारतीय ऋषि-मुनींनी प्रतिपादन केलेल्या शिकवणीमुळे भारतच जगाला दिशादर्शन करू शकते. आध्यात्मिक मार्गामध्ये जगातील सर्व समस्यांवर उपाय काढण्याची क्षमता आहे. आपण श्रद्धावान (बिलिव्हर्स) आणि अश्रद्ध (नॉन-बिलिव्हर्स) यांच्यामध्ये जगाचे विभाजन करता कामा नये, असे प्रतिपादन ‘सी-२० परिषदे’च्या आंतरराष्ट्रीय समन्वयक प्रा. डॉ. शशीबाला यांनी केले.

 

*मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सर्वांवर चांगला परिणाम होतो ! – सौ. श्वेता क्लार्क*

भारतातील मंदिरे भारताच्या गौरवाशाली परंपरेला मूर्त रूप देतात, तसेच भारताच्या समृद्ध संस्कृतीची साक्ष देतात. मंदिरांच्या अद्वितीयत्वाविषयी ही माहिती सांगत असतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोध समन्वयक सौ. श्वेता क्लार्क यांनी धनबाद (झारखंड) येथील स्वयंभू महादेव मंदिरातील स्वत:चे अनुभव कथन केले. सौ. श्वेता क्लार्क म्हणाल्या की, मंदिराला भेट देणार्‍या भाविकांवर मग ते कुठल्याही धर्माचे असोत, तेथील सकारात्मक ऊर्जेचा त्यांच्यावर चांगला परिणाम होतोच, हे ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.

या वेळी प्रतिष्ठित मान्यवरांमध्ये ‘सिंगापुर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या मंडळाचे सदस्य श्री. मनीष त्रिपाठी, ‘प्राचीन वारसा आणि तंत्रज्ञान यांद्वारे मानवतेची सामूहिक चेतना उंचावणारे’ श्री. अजित पद्मनाभ, गोवा येथील ‘श्रीनिवास सिनाई ढेम्पो कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य तथा साहित्यिक, लेखक प्रा.(डॉ.) मनोज कामत, ‘गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे अध्यक्ष श्री. महेश पाटील, ‘संत ईश्वर फाऊंडेशन’च्या राष्ट्रीय सचिव वृंदा खन्ना, ‘आयुर्वेद आणि निसर्गोपचार तज्ञ’ डॉ. निशी भट्ट, ‘पार्क हॉटेल्स’चे महाव्यवस्थापक श्री. सौरभ खन्ना, सेलबोटीतून एकट्याने पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय कॅप्टन दिलीप डोंडे यांचेही अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि सादरीकरण झाले.